आयटी क्षेत्राच्या महसुलात घट होणार
मुंबईः
भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीने महसुलात घट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. ग्राहकांनी जागतिक मंदीच्या धास्तीने खर्चात कपात करण्याचे धोरण अवलंबल्याने,आयटी क्षेत्राला त्याचा फटका बसेल, असे विप्रोने म्हटले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तसेच एचसीएल या कंपन्यांनीही युरोपिय ग्राहक खर्च कमी करत आहेत, याकडे लक्ष वेधले होते.
विप्रोने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कंपनीला मोठ्या आर्डर मिळत असल्या, तरी बाजारपेठेत अस्थिरता आहे. त्यामुळे करार करणे आणि त्याचे महसुलात रुपांतर करणे, याला वेळ लागणार आहे.
जगभरात मंदीचे वातावरण असताना भारतातील आयटी कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत चांगली कमाई केली होती. त्यामुळे विप्रोने महसुलात घट होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने, आयटी क्षेत्रात काळजीचे वातावरण आहे.