आम्हाला धडा मिळाला आहेः शेहबाज शरीफ
नवी दिल्लीः
पाकिस्तानला भारतासोबत शांततेत राहायचे असून, कश्मीरसारख्या ज्वलंत प्रश्नांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गंभीर आणि प्रामाणिक चर्चा करायची आहे. भारताबरोबर पाकने तीन युद्धे लढली असून, त्यातून योग्य तो धडा मिळालेला आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
दुबईस्थित अल अरेबिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरीफ म्हणाले की, भारतासोबतच्या तीन युद्धांनंतर पाकिस्तानने धडा शिकला आहे. आता त्याला आपल्या शेजाऱ्यासोबत शांतता हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन आहे की, आपण टेबलावर बसू आणि कश्मीरसारख्या ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी चर्चा करू यात. शांततेने जगणे आणि प्रगती करणे किंवा एकमेकांशी भांडणे आणि वेळ आणि संसाधने वाया घालवणे हे आपल्यावर अवलंबून आहे, असे शेहबाज शरीफ म्हणाले.
भारतासोबत आपली तीन युद्धे झाली आहेत आणि त्यांनी पाकी जनतेवर दुःख, गरिबी आणि बेरोजगारी आणली. यातून आम्ही धडा शिकलो आहोत आणि आम्हाला भारतासोबत शांतता प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.