
भारताची १.२ बीपीडी रशियन तेलाची आयात
नवी दिल्लीः
रशियन तेलाच्या किमतीवर युरोपिय महासंघ, जी-७ समुह तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी निर्बंध लादल्यानंतर रशियन तेलाची विक्रमी आयात भारताकडून होत आहे. डिसेंबरमध्ये भारताने सर्वाधिक १.२ दशलक्ष बॅरल प्रतिदिन (बीपीडी) इतकी विक्रमी उच्चांकी आयात केली आहे. युरोपिय महासंघाच्या निर्बंधांनंतर रशियाने भारताला अतिरिक्त सवलत दिली आहे. ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून भारताची नवीन ओळख प्रस्थापित झाली आहे. डिसेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये ही खरेदी तब्बल ३३ पट इतकी वाढली आहे.
पाश्चात्य खरेदीदारांनी रशियाकडून कच्च्या तेलापासून दूर राहण्यास सुरुवात केल्यानंतर, चीनच्या बरोबरीने भारत हे रशियन तेल निर्यातीचे प्रमुख ठिकाण बनले आहे. इराकला मागे टाकून रशिया आता भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनला आहे.
दि. ५ डिसेंबर रोजी रशियन तेलाच्या किमतीवर युरोपिय महासंघाने निर्बंध लागू केला. तथापि, भारताने सवलतीच्या दरात मिळणाऱ्या तेलाची खरेदी सुरू ठेवली. जानेवारी महिन्यात भारत १.४ बीपीडी इतके तेल खरेदी करत आहे. तसेच रशियाच्या आर्क्टिक क्रूड तेलाचीही आयात भारत करत आहे.
चीन आणि भारताने युरोपिय महासंघाने रशियन तेलासाठी जी किंमत निर्धारित केली आहे, त्याचा स्वीकार केलेला नाही. हे दोन्ही देश रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार देश आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा विचार न करता, रशियाबरोबर व्यापार सुरू ठेवल्याने, या दोन्ही देशांना त्याचा सर्वाधिक लाभ होतो आहे. तसेच रशिया त्यांना जास्तीची सवलत देत आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.