
भारताच्या संकल्पावर जग विश्वास दाखवत आहे
मुंबईः
स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताला आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठीचे धाडस मिळाले आहे. जग भारतावर विश्वास दाखवत असल्याची ही पहिलीच घटना आहे. भारत आपल्या क्षमतांचा वापर उत्तम गोष्टींसाठी करत असल्याच्या विश्वासामुळेच ही सकारात्मकता दिसून येते आहे. आज भारत अभूतपूर्व विश्वासाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून प्रेरणा घेऊन डबल इंजिन सरकारमध्ये स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. १९) मुंबई येथे बहुविध विकास उपक्रमांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या प्रकल्पांमध्ये, मुंबई मेट्रो रेल्वे 2A आणि 7 या मार्गांचे लोकार्पण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे आणि सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, 20 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन आणि मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पाची पायाभरणी यांचा समावेश आहे. त्यावेळी ते बोलत होते. भारतात जेव्हा केवळ गरिबीवर आणि जगाकडून मदत मिळवण्यासाठीच्या पर्यायांवर चर्चा होत असे त्या काळाचे स्मरण त्यांनी केले.
पंतप्रधान म्हणाले की, देशातील एक मोठा काळ हा घोटाळ्यांसदर्भात लक्षात ठेवला जाईल. सर्वसामान्य जनतेचा पैसा हा घोटाळे करून खाण्यासाठीच आहे, असा एक मोठा समज देशात होता. आज तो काळ भूतकाळात जमा झाला आहे. आपण ही विचारधारा बदलली आहे आणि आज भारत भविष्यवादी मनोधारणा तसेच आधुनिक दृष्टीकोनासह भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर पैसा खर्च करत आहे. गृहनिर्माण, शौचालये, वीज,पाणी, स्वयंपाकाचा गॅस, मोफत वैद्यकीय उपचार, वैद्यकीय महाविद्यालये, एम्स,आयआयटी आणि आयआयएम यांचा वेगाने विस्तार होत असताना दुसरीकडे आधुनिक संपर्क सुविधेला देखील मोठी चालना मिळत आहे. आजच्या गरजा आणि उद्याच्या शक्यता अशा दोन्ही पातळ्यांवर काम सुरु आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत देखील भारत 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे, तसेच पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. हे आजच्या भारताच्या कटिबद्धतेचे निदर्शक आहे आणि विकसित भारताच्या संकल्पनेचे प्रतिबिंब आहे, असा दावाही त्यांनी केला.
विकसित भारताच्या उभारणीत शहरांकडे असलेल्या भूमिकेवर मोदी यांनी भर दिला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक शहरे भारताच्या विकासाला प्रेरणा देणार आहेत. म्हणूनच मुंबई शहराला भविष्याच्या दृष्टीने सज्ज करणे हे दुहेरी इंजिन असलेल्या सरकारच्या महत्त्वाच्या प्राधान्याक्रमांपैकी एक आहे. वर्ष 2014 मध्ये मुंबईत 10-11 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग होता. आता डबल इंजिन सरकारच्या प्रेरणेने मेट्रोच्या कामाला नवा वेग आणि प्रमाण प्राप्त झाले असून लवकरच मेट्रो रेल्वेचे 300 किलोमीटर लांबीचे जाळे उभारण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे. आगामी काळात मुंबईच्या उपनगरी सेवेचे आधुनिकीकरण, मेट्रो जाळ्याचा विस्तार, वंदे भारत ट्रेन आणि बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगवान अत्याधुनिक संपर्कव्यवस्था यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
गरीब मजूर आणि कर्मचाऱ्यांपासून दुकानदार आणि खूप मोठ्या व्यावसायिकांपर्यंत मुंबईत राहाणाऱ्या सर्वांनाच मोठी सोय उपलब्ध होणार आहे. शेजारी जिल्ह्यांमधून आता मुंबईत प्रवास करणे देखील सोपे होणार आहे. कोस्टल रोड, इंदू मिल स्मारक, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक यांसारखे प्रकल्प आणि अशाच प्रकारचे इतर प्रकल्प मुंबईला एक नवी शक्ती प्रदान करत आहेत. भारतीय शहरांचा कायापालट करण्यासाठी काम सुरू आहे. प्रदूषण आणि स्वच्छता यांसारख्या व्यापक शहरी समस्यांवर तोडगे शोधले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहन वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, जैवइंधन आधारित परिवहन प्रणाली, हायड्रोजन इंधनावर मोहिमेच्या स्वरुपातील भर आणि नद्यांची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्रे ही या दिशेने उचललेली काही पावले आहेत, असेही मोदी म्हणाले.
भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान रस्त्यावरील विक्रेत्यांना म्हणाले, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही दहा पावले टाकलीत, तर मी अकरा पावले टाकायला तयार आहे. देशातील कष्टकरी जनता मोठा बदल घडवून आणणार असून त्यांच्या कामाने आणि समर्पणाने देश नवीन उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या विकासकामांसाठी त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोडी महाराष्ट्राची स्वप्ने साकार करेल अशी ग्वाही जनतेला दिली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदी या वेळी उपस्थित होते.
“शहरांच्या विकासासाठी क्षमता आणि राजकीय इच्छाशक्तीचा कोणताही अभाव नाही. तरीही मुंबईसारख्या शहराचा विकास तेथील स्थानिक शहरी शासनसंस्थेमध्ये जलद विकासाची तितक्याच प्रमाणात निकड असल्याशिवाय होऊ शकणार नाही. त्यामुळेच मुंबईच्या विकासात स्थानिक शहरी शासन संस्थेची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे,”