
एअर इंडिया एअरबसकडून खरेदी करणार २३५ विमाने
दिल्लीः
एअर इंडिया एअरबस या युरोपिय कंपनीकडून २३५ विमाने खरेदी करणार असून, यासंदर्भातील घोषणा २७ तारखेला केली जाईल, असे कंपनीतील उच्चपदस्थांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले आहे. एअर इंडिया ४९५ विमानांची खरेदी करणार आहे. हा विमान खरेदी करार अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी (दि. २७) यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकाच वेळी एखाद्या विमान कंपनीने एकत्रित २३५ विमाने खरेदी करण्याचा हा व्यवहार गेल्या कित्येक वर्षातला सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे.
टाटा समुहाने एअर इंडियाची मालकी पुन्हा मिळविल्यानंतर एक वर्षानंतर याबाबतीत अधिकृत घोषणा करण्यात येईल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. १९३२ साली टाटा यांनी एअर इंडियाची स्थापना केली होती. टाटा समूहाने म्हटले आहे की, येत्या पाच वर्षांत एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान कंपनी असा नावलौकिक मिळावा, यासाठी कंपनी पूर्णपणे प्रयत्न करत आहे.
एअरबस बरोबर केलेला विमान खरेदीचा हा करार एअरबसचे भारतातील स्थान मजबूत करणारा ठरणार आहे. इंडिगो ही एअरबसच्या ए३२० विमानांची सर्वात मोठी ग्राहक आहे.