
गुगल करणार १२ हजार कर्मचाऱ्यांना कमी
मुंबईः
गुगलची पालक कंपनी अल्फाबेटने जगभरातून १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यासंदर्भात गुगल ब्लॉगवर मेल पाठवला आहे. अतिशय कठोर होऊन हा निर्णय घ्यावा लागत असून, त्याची संपूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचेही त्यांनी मेलमध्ये नमूद केले आहे.
कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या दिग्गज टेक कंपन्यांमध्ये आता गुगलचेही नाव जोडले गेले आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, मेटा (फेसबुक), अॅमेझॉन तसेच ट्विटर यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. काही आठवड्यांत हजारो कर्मचाऱ्यांना त्यांनी घरी पाठवले होते. एका सर्वेक्षणानुसार जगभरातील १३३ कंपन्यांनी २०२३ मध्ये एकंदरित ३८ हजार ८१५ कामगार कपातीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी १ हजार ३० कंपन्यांनी तब्बल १ लाख ५४ हजार ८४३ जणांना घरी पाठवले होते.
भारतातील नेमक्या किती कर्मचाऱ्यांना गुगलच्या या निर्णयाचा फटका बसेल, हे स्पष्ट झालेले नाही. २०१९ मध्ये कंपनीत ३१.६ टक्के इतकी कर्मचारी वाढ झाली होती. सोमवारी टाळेबंदीबाबत सविस्तर घोषणा केली जाईल. तसेच याचा तपशील जाहीर केला जाईल, असेही पिचाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्विगी या फूडटेक कंपनीने ३८० कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.