
डे ला रु कंपनीची होणार सीबीआय चौकशी (?)
नवी दिल्लीः
भारतातील माजी वित्त सचिवाच्या आर्थिक कथित गैरव्यवहारप्रकरणी चलनी नोटांची छपाई करणारी कंपनी डे ला रुची सीबीआय चौकशी होऊ शकते, याची कल्पना असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. २०१६ पूर्वी (नोटाबंदी लागू होण्यापूर्वी) गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून, कंपनी याबाबत काहीही भाष्य करणार नाही. तथापी, भारतातील तपास यंत्रणांना योग्य ते सहकार्य करू, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच कोणत्याही गैरव्यवहारात सहभागी असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजी वित्त सचिव अरविंद मायाराम यांच्या कथित गैरव्यवहारांबाबत समाज माध्यमांत चर्चा होत असून, याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त आलेले नाही. मात्र, डे ला रू कंपनीचा या कथित गैरव्यवहारात कोणताही सहभाग नाही. असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने याबाबत निवेदन दिले असून, त्यानंतर कंपनीचे समभाग आठ टक्क्यांनी घसरले.
सीबीआयने नवी दिल्ली तसेच जयपूर येथील मायाराम यांच्या घराची झडती घेतल्याचे वृत्त माध्यमांतून आले होते. १० जानेवारी रोजी सीबीआयने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, २०१३ मध्ये मायाराम यांनी डी ला रुला भारतीय चलनी नोटांसाठी विशेष सुरक्षा धागा पुरविण्यासाठीच्या कराराला मुदतवाढ दिली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, याबाबत मायाराम यांनी सीबीआय निष्पक्ष तपास करेल असा विश्वास वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच डे ला रूने केनियामधील चलनी नोटा छपाईचे कामकाज थांबवले आहे.