
बीबीसी माहितीपटाचे वार्तांकन करताना रॉयटर्सचा खोडसाळपणा

लंडन येथील बीबीसीच्या कार्यालयाबाहेरचे छायाचित्र (सौजन्य रॉयटर्स)
मुंबईः
गोध्रा जळितानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीच्या माहितीपटाचे प्रसारण भारतात रोखण्यात आले आहे. तसेच या माहितीपटाची कोणतीही क्लिप समाज माध्यमांद्वारे शेअर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या यासंबंधीच्या वृत्तात २००२ साली हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला आग लागल्याने ५९ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हिंसाचार उसळला, असे नमूद करण्यात आले आहे. (The violence erupted after a train carrying Hindu pilgrims caught fire, killing 59.) रॉयटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबतचे वार्तांकन करताना निष्पक्षपाती दाखवणे अपेक्षित असताना, तसे झालेले दिसून येत नाही. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने केलेला खोडसाळपणा हाही बीबीसीसारखाच २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात जातीय तणाव निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न आहे का, याचे उत्तर शोधावे लागणार आहे.
यापूर्वीही अमेरिकी माध्यमांनी भारताबाबत विशेषतः मोदी यांच्यासंबंधी बातम्या देताना खोडसाळपणा केल्याचे प्रकार घडले आहेत.
मोदी पश्चिमेकडील गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते झालेल्या जातीय दंगलीत हजारांहून अधिक लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुसंख्य मुस्लिम होते. मानवाधिकार कार्यकर्त्यांचा अंदाज आहे की दंगलीत मृत्यू झालेल्यांची संख्या किमान दुप्पट आहे, असेही रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.सर्वोच्च न्यायायल, तसेच सर्व तपास यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चिट दिलेली असताना, गोध्रा जळीतानंतर उसळलेल्या जातीय दंगलीचा संबंध तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोदी यांच्याशी जोडून बीबीसी नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच पश्चिमी वृत्तसंस्था गोध्रा जळीताचा उल्लेख का करत नाहीत, हाही प्रश्न अनुपस्थित राहतो.
दरम्यान, गेल्या आठवड्यात, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बीबीसीच्या माहितीपटाला “अपप्रचाराचा तुकडा” असे संबोधले आहे. त्याचवेळी ब्रिटीश खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी पंतप्रधान मोदी यांचे इंग्लंडच्या संसदेत कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक आहेत, असे लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी म्हटले आहे.